पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात सावकारीच्या (Pune Crime) त्रासामुळे एका गरीब महिलेवर मानसिक दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुणे-भांडी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेने आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी ओळखीच्या महिलांकडून 20 टक्के व्याजाने 20000 रुपये घेतले होते. मात्र व्याजासह संपूर्ण रक्कम परत केल्यानंतरही आरोपींकडून आणखी 20000 रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी 4 महिलांसह 7 जणांविरोधात सावकारी (नियमन) अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणात कोंढव्यातील काकडे वस्ती येथे राहणाऱ्या 40 वर्षीय महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार सावित्री येल्लप्पा गायकवाड, येल्लप्पा गायकवाड, नताशा गायकवाड, पायल गायकवाड, विकास गायकवाड (सर्व रा. काकडे वस्ती, कोंढवा) तसेच आणखी एक महिला आणि एक पुरुष यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यासाठी त्यांनी ओळखीच्या महिलांकडून 20000 रुपये उसने घेतले. मात्र या रकमेवर तब्बल 20 टक्के व्याज आकारण्यात आले होते. काही काळानंतर फिर्यादी महिलेने व्याजासह संपूर्ण रक्कम परत केली.
तरीदेखील आरोपींकडून आणखी 20000 रुपये देण्याची मागणी करण्यात येत होती. 28 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी फिर्यादीच्या घरी आले. त्यांनी फिर्यादीच्या पतीकडे अतिरिक्त पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास त्यांची दुचाकी घेऊन जाऊ अशी धमकी दिली. यावेळी आरोपींनी गाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना विरोध केल्यानंतर वाहनाचे नुकसान करण्यात आले तसेच फिर्यादीच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शांतताभंग करणे, नुकसान करणे आणि धमकी देणे या कलमांबरोबरच सावकारी (नियमन) अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.







