पुणे: हवेली तालुक्यातील काही गावांमधील रस्त्यांच्या सीमांकनाच्या प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपविभागीय अधिकारी, हवेली यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणेचे संचालक आणि पंचायत समिती हवेलीचे सदस्य सुदर्शन जयप्रकाश चौधरी यांनी हे निवेदन देत महसूल व वन विभागाच्या 29 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी केली.

या शासन निर्णयानुसार हवेली तालुक्यातील सोरतापवाडी, तरडे, वळती, शिंदवणे आणि उरुळी कांचन या गावांमध्ये गाव नकाशावर असलेल्या तसेच नोंद नसलेल्या सर्व रस्त्यांचे सीमांकन करून त्यांना स्वतंत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या भागातील शेतकऱ्यांना शेती रस्ते आणि गाव रस्त्यांबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चौधरी यांनी सांगितले. स्पष्ट सीमांकन नसल्यामुळे शेतजमिनीपर्यंत जाणाऱ्या मार्गांवरून अनेकदा वाद निर्माण होतात. काही ठिकाणी रस्त्यांची अधिकृत नोंद नसल्याने शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आवश्यक असलेल्या वाहतुकीतही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे शासन निर्णयानुसार सर्व रस्त्यांचे मोजमाप करून त्यांना अधिकृत क्रमांक देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हा प्रश्न तातडीने निकाली काढून झालेल्या कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने रस्त्यांचे स्पष्ट सीमांकन आणि त्याची अधिकृत नोंद अत्यंत महत्त्वाची ठरते. यामुळे भविष्यात जमीन आणि रस्त्यांबाबत होणारे वाद टाळता येतात तसेच शेतीसाठी आवश्यक असलेल्या वाहतुकीला गती मिळते. त्यामुळे प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकारी माने यांनी या निवेदनाची दखल घेत तहसीलदारांशी चर्चा करून पुढील आठवड्यात या संदर्भात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा पाठपुरावा पुढेही सुरू ठेवणार असल्याचे सुदर्शन चौधरी यांनी सांगितले.







