पुणे: हवेली तालुक्यातील सोरतापवाडी, तरडे, वळती आणि शिंदवणे या गावांमधील वाढत्या वीज समस्येबाबत शेतकरी प्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. कृषि उत्पन्न बाजार समिती, पुणेचे संचालक आणि पंचायत समिती हवेलीचे सदस्य सुदर्शन जयप्रकाश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांच्या शिष्टमंडळाने उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे यांची भेट घेतली.

या भेटीत संबंधित गावांमध्ये वाढत्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः कॅनॉल परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतीपिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. विजेचा वाढता लोड आणि पुरेशा क्षमतेचा पुरवठा नसल्यामुळे अनेक वेळा पंप सुरू ठेवणेही कठीण होत असल्याची समस्या त्यांनी मांडली.
तसेच लोडशेडिंगच्या वेळेबाबत कोणतेही निश्चित वेळापत्रक नसल्याने शेतकरी संभ्रमात असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले. शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज कधी मिळेल याची माहिती नसल्यामुळे शेतीचे नियोजन करणे कठीण होत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यामुळे लोडशेडिंगसाठी ठराविक वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी उजव्या कालव्यावरील अधिकृत वीज मोटारी सरसकट बंद करू नयेत, याबाबतही चर्चा करण्यात आली. काही शेतकरी नियमितपणे अधिकृत मोटारींच्या माध्यमातून पाणी उपसा करत असताना वीजतोडीमुळे त्यांचे काम ठप्प होते, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, काही व्यक्ती सिंगल फेजवर किंवा कॅपेसिटर बसवून बेकायदेशीरपणे मोटारी चालवत असल्याची बाबही या बैठकीत समोर आली. अशा प्रकारांमुळे विजेचा ताण वाढतो आणि इतर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे अशा बेकायदेशीर जोडण्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना नियमित वीजपुरवठा मिळावा आणि समस्या मार्गी लागाव्यात यासाठी प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे सुदर्शन जयप्रकाश चौधरी यांनी यावेळी सांगितले.







