पुणे: नोकरीच्या शोधात असलेल्या (Pune Crime) तरुणांना परदेशात नोकरीचे आमिष दाखवून ड्रग्ज तस्करीत ओढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. लोहगाव विमानतळावर कस्टम विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने केलेल्या कारवाईत तब्बल 8.71 कोटी रुपये किमतीचे ‘हाय-एंड हायड्रोपोनिक वीड’ जप्त करण्यात आले असून या प्रकरणात पाच तरुणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे अमली पदार्थ चक्क चॉकलेटच्या बॉक्समध्ये लपवून भारतात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. (Latest Marathi News)

कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना बँकॉकहून पुण्यात आलेल्या इंडिगो विमानातील चार प्रवाशांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची सखोल तपासणी केली. या तपासणीत त्यांच्या हॅण्डबॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चॉकलेटचे बॉक्स आढळले. सुरुवातीला हे सामान सामान्य वाटले, मात्र बॉक्स उघडल्यावर त्यामध्ये एअरटाईट सीलबंद केलेली 16 पाकिटे सापडली. या पाकिटांमध्ये 8 किलोहून अधिक प्रमाणात उच्च प्रतीचे हायड्रोपोनिक वीड लपवण्यात आले होते. बाजारात या ड्रग्जची किंमत सुमारे 8.71 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी चार तरुण झारखंड राज्यातील असून त्यांचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान आहे. पुणे विमानतळावर त्यांना घेण्यासाठी आलेला पाचवा तरुण रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. या सर्वांना कस्टम विभागाने ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे.
तपासादरम्यान या तरुणांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना बँकॉकमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून परदेशात बोलावण्यात आले होते. मात्र तिथे गेल्यानंतर कोणतेही काम देण्यात आले नाही. परत येताना त्यांना काही चॉकलेटचे बॉक्स दिले गेले आणि ते भारतात आणण्यास सांगितले गेले, असा दावा त्यांनी केला आहे.
कस्टम विभागाच्या प्राथमिक तपासानुसार हा प्रकार आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित असण्याची शक्यता आहे. बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचा ‘कुरिअर’ म्हणून वापर केला जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे तरुणांनी परदेशातील नोकरीच्या ऑफर स्वीकारताना अत्यंत सावध राहण्याची गरज असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाच्या तपासातून आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







