Crime : मुंबईत शिक्षण घेणाऱ्या एका 24 वर्षीय MDS विद्यार्थिनीच्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली आहे. प्रियकराकडून सतत चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याच्या मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या 6 पानी सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. ही घटना अँटॉप हिल परिसरात घडली असून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.

मृत विद्यार्थिनीचे नाव स्तुती सोनावणे असे असून ती नवी मुंबईतील एका डेंटल कॉलेजमध्ये MDS (Master of Dental Surgery) चे शिक्षण घेत होती. ती आई-वडील आणि बहिणीसोबत अँटॉप हिल परिसरात राहत होती. 10 मार्च रोजी सकाळी सुमारे 11 वाजेपर्यंत ती आपल्या खोलीतून बाहेर आली नाही. त्यामुळे कुटुंबीयांना संशय आला. दरवाजा उघडून पाहिले असता तिने नायलॉनच्या ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. तिला तातडीने लोकमान्य टिळक महानगरपालिका सामान्य रुग्णालय येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
घटनास्थळावरून पोलिसांना 6 पानांची सुसाईड नोट सापडली आहे. या नोटमध्ये स्तुतीने आपल्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. नोटमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, मोहम्मद फुझीयाल नावाच्या तरुणाशी तिचे काही काळापासून संबंध होते. सुरुवातीला दोघांमधील नाते चांगले होते; मात्र कालांतराने वाद वाढू लागले. विशेषतः प्रियकराकडून तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतला जात असल्याने ती मानसिकदृष्ट्या खचत गेल्याचे नोटमध्ये नमूद आहे.
या नोटमध्ये आणखी एक धक्कादायक उल्लेख आहे. मित्र-मैत्रिणींकडून कधीकधी मस्करीत “एक दिवस तू आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील” असे बोलले जात असल्याचा उल्लेख तिने केला आहे. हा संदर्भ चर्चेत आलेल्या श्रद्धा वालकर केस कडे निर्देश करणारा असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद करून सुसाईड नोटमधील आरोपांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड, संदेश आणि दोघांमधील संवादाची पडताळणी केली जात असून, या प्रकरणामागील नेमकी पार्श्वभूमी लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.







