लोणी काळभोर, ता. 10 : गेल्या अनेक वर्षांपासून लोणी काळभोर परिसरात (Loni Kalbhor News) कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता. नदीपात्रात टाकला जाणारा कचरा, त्यातून होणारे प्रदूषण आणि वारंवार लागणाऱ्या आगीमुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आता या प्रश्नावर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले असून पुढील दोन महिन्यांत कचरा वर्गीकरण व प्रक्रिया प्लांट उभारला जाणार आहे. अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी दिली. त्यामुळे लोणी काळभोरच्या कचऱ्याच्या प्रश्नाला कायमचा पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Latest Marathi News)

कचऱ्याच्या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हवेली उपविभागीय अधिकारी कार्यालयात सोमवारी (ता.9) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बैठक पार पडली. या बैठकीत कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने वर्गीकरण करून त्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीस एमआयटी शिक्षण समूहाचे कार्याध्यक्ष मंगेश कराड, कुलगुरू महेश चोपडे, हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी काळभोरचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, लोणी काळभोरचे सरपंच तथा प्रशासक नागेश काळभोर, माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच नासिर पठाण तसेच दोन्ही ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रशांत काळभोर म्हणाले की, या बैठकीत लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 113 ही 7.34 हेक्टर सरकारी जमीन कचरा प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली. या जागेची सर्वप्रथम अधिकृत मोजणी करण्यात येणार असून त्यानंतर केसनंदच्या धर्तीवर आधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी लोणी काळभोर ग्रामपंचायत, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत आणि एमआयटी शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त पुढाकारातून काम केले जाणार आहे. एमआयटी विद्यापीठाच्या माध्यमातून सीएसआर निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्याचाही तोडगा बैठकीत काढण्यात आला.
जिल्हा परिषद आणि पीएमआरडीएच्या माध्यमातून शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या पुढाकाराने पुणे–सोलापूर महामार्गालगत एक मोठा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू आहे. पुढील एक वर्षाच्या आत हा प्रकल्प कार्यान्वित होणार असून त्याचा फायदा पुणे–सोलापूर महामार्गावरील सुमारे 25 ते 30 गावांना होणार आहे. असेही प्रशांत काळभोर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कचऱ्याच्या प्रश्नामुळे निर्माण झालेली पर्यावरणीय समस्या, दुर्गंधी आणि आरोग्याच्या तक्रारी यावर कायमचा तोडगा निघण्याची शक्यता आहे. प्रस्तावित प्रकल्प वेळेत पूर्ण झाल्यास लोणी काळभोर परिसरातील कचरा व्यवस्थापनाला शाश्वत दिशा मिळणार आहे.







