Pune Crime : पुणे: पुणे शहरात बेकायदेशीर व्यवसाय लपवण्यासाठी गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या शक्कल लढवली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लरचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. बाहेरून पूर्णपणे बंद दिसणारे हे हॉटेल आतून मात्र सुरू असल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

स्वारगेट येथील लक्ष्मीनारायण चौकात असलेल्या मोदी प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ‘एलडिनेरो’ नावाचे हॉटेल आहे. या ठिकाणी बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र हॉटेलचे शटर आतून घट्ट बंद होते. पोलिसांनी अनेक वेळा आवाज दिला, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे कुलूप तोडण्यात आले. शटर उघडताच आतले दृश्य पाहून पोलिसही चकित झाले. बाहेरून बंद वाटणाऱ्या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहक बसले होते. कर्मचारी ग्राहकांकडून रोख रक्कम घेत तंबाखूजन्य हुक्का पुरवत असल्याचे आढळले.
या कारवाईत पोलिसांनी हॉटेल मालक प्रतीक मेहता, व्यवस्थापक सनी परिहार आणि पाच वेटर अशा एकूण 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत व्यवस्थापकाने मालकाच्या सांगण्यावरूनच हा व्यवसाय गुपचूप सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 22560 रुपयांचे हुक्का साहित्य व इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
पुणे शहरात अशा प्रकारच्या बेकायदेशीर हुक्का पार्लरविरोधात पुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.







