पुणे: वानवडी पोलिसांनी (Pune Crime) गावठी हातभट्टी दारूविरोधात मोठी (Pune Police) कारवाई करत महिंद्रा टेम्पोचा पाठलाग करून तब्बल 1150 लिटर (Pune News) गावठी दारूसह चार आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई 23 डिसेंबर 2025 रोजी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. (Latest Marathi News)

वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक आणि तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार दया शेगर आणि अमोल पिलाणे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, गावठी हातभट्टीची दारू महिंद्रा टेम्पोमधून वाहतूक केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयित वाहनाचा शोध घेण्यात आला.

दरम्यान, सोपानबाग, घोरपडी परिसरात महिंद्रा कंपनीचा सुप्रो मिनी ट्रक व्ही.एक्स मॉडेल टेम्पो क्रमांक एमएच 12 एसएक्स 4668 जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून हे वाहन थांबवले. तपासणीदरम्यान टेम्पोमध्ये लियाकत रोहीत अब्बासी (वय 32), श्रीकांत बापू साबळे (वय 21), संकेत विजय वाबळे (वय 19) आणि विशाल दुर्योधन संगोडिया (वय 18) हे चार आरोपी आढळून आले.
चौकशीत लियाकत अब्बासी याने पुणे शहरात गावठी दारू मिळत नसल्याने यवत येथून विशाल संगोडिया याच्याकडून तयार हातभट्टी दारू खरेदी करून ती कुंड्या आणि झाडांच्या आड लपवून पुण्यात आणत असल्याची कबुली दिली. टेम्पोची झडती घेतली असता 35 लिटर क्षमतेचे 33 प्लास्टिक कॅन आढळून आले. त्यामध्ये एकूण 1150 लिटर गावठी हातभट्टीची दारू सापडली.
या कारवाईत गावठी दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेला महिंद्रा सुप्रो टेम्पो असा एकूण 5 लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णू सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले आणि अर्षद सय्यद यांचा समावेश होता.







