पुणे: पुण्यात गुटखा बंदी असतानाही (Pune Crime) अवैध साठा आणि वाहतूक सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. आंबेडकर चौकाकडून संगमवाडीच्या दिशेने जाणाऱ्या एका पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करत लक्ष्मीनगर पोलिसांनी दोन जणांना अटक केली. या कारवाईत वाहनासह सुमारे 20 लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Breaking News)

दुर्देश मोहनलाल जाट (वय 19, रा. रामनगर, येरवडा) आणि त्याचा साथीदार जगदिश वाघराम जाट (वय 28, रा. ताडीवाला रोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हे दोघे पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक करणार असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी येरवडा परिसरातील दर्गा चौक येथे सापळा रचून संशयित वाहन अडवले. वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला.
महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूच्या विक्रीवर अनेक वर्षांपासून बंदी असली तरीही अवैध साठा आणि तस्करीचे प्रकार अधूनमधून उघड होत आहेत. अशा अवैध व्यापारामुळे तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते, तसेच सरकारला महसुलाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे अशा कारवायांमुळे अवैध पुरवठा साखळीवर काही प्रमाणात आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या गुटख्याचा साठा नेमका कुठून आणला आणि तो कोणत्या ठिकाणी पुरवठा करण्यासाठी नेला जात होता, याचा तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.







