पुणे: चाकण औद्योगिक पट्ट्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीचा रक्तरंजित (Pune Crime) प्रकार समोर आला आहे. नाणेकरवाडी येथे मित्रांमधील वाद इतका टोकाला गेला की एका तरुणानेच धारदार चाकूने सपासप वार करत आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Breaking News)

मृत तरुणाचे नाव किशोर सुरेश राणे (वय 25) असे आहे. बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास नाणेकरवाडीतील एका भाड्याच्या खोलीत हा प्रकार घडला. किशोर आणि त्याचा मित्र कपिल जितेंद्र कोसलकर हे दोघे एकत्र असताना त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. नेमका वाद कशावरून झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र बोलाचालीतून वाद विकोपाला गेला आणि कपिलने जवळ असलेल्या चाकूने किशोरवर हल्ला चढवला.
आरोपीने किशोरच्या छातीवर आणि जबड्यावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत केली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु अतिरक्तस्राव आणि खोल जखमांमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी योगेश दत्तात्रेय नाणेकर यांनी तक्रार दिली असून चाकण दक्षिण पोलीस ठाणे यांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटना घडल्यानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी कपिल कोसलकर याला पोलिसांनी तातडीने अटक केली. सध्या त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे.







