पुणे: पुण्यातील लोहगाव परिसरातील (Pune Shocking News) मराठवाडा मित्रमंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MMIT) या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात दूषित पाण्यामुळे 12 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सर्व बाधित विद्यार्थिनींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय देखरेख ठेवण्यात आली आहे. (Latest Marathi News)

विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून वसतिगृहातील फिल्टरमधून पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत होते. 10 फेब्रुवारी रोजी काही विद्यार्थिनींना पाण्याच्या टाकीत आणि बादल्यांमध्ये काळ्या रंगाच्या अळ्या दिसल्याचा दावा करण्यात आला. संबंधित फोटो आणि व्हिडिओ प्रशासनाला दाखवूनही तातडीने प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. जानेवारी महिन्यात तक्रार केल्यानंतर टाकी स्वच्छ केल्याचे सांगण्यात आले, मात्र फिल्टर बदलण्यात आला नव्हता, असेही त्यांचे म्हणणे आहे.
विषबाधेची लक्षणे दिसू लागल्यानंतर काही विद्यार्थिनींना चक्कर येणे, उलट्या होणे आणि अशक्तपणा जाणवू लागला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात विलंब झाल्याचा आरोपही विद्यार्थिनींकडून करण्यात आला आहे.
उपचारादरम्यान रक्त तपासणीचे अहवाल त्वरित न देण्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तथापि, या संदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. घटनेनंतर पालकांमध्ये संताप व्यक्त होत असून वसतिगृहातील पाणीपुरवठा, स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षिततेबाबत सखोल चौकशीची मागणी होत आहे.
या घटनेमुळे निवासी शैक्षणिक संस्थांमध्ये मूलभूत सुविधांची गुणवत्ता आणि आरोग्य सुरक्षा मानके काटेकोरपणे पाळली जात आहेत का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागाकडून पाणी नमुन्यांची तपासणी आणि पुढील कारवाई अपेक्षित आहे.







