पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका मध्यरात्री (Shirur News) झालेल्या भीषण अपघाताने हादरला आहे. निमोणे गावाजवळ शिरूर–न्हावरे चौफुला रोडवरील नलगे वस्ती परिसरात एका कारचा गंभीर अपघात होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. (Pune Accident)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास कार भरधाव वेगात असताना अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की वाहनाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र जखमा अत्यंत गंभीर असल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. एका व्यक्तीला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात पवन काळे, आराध्या काळे आणि बाळासाहेब नागवडे यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. वाहन ताब्यात घेऊन अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे. वेग, वाहनावरील नियंत्रण सुटणे किंवा रस्त्यावरील परिस्थिती यापैकी कोणता घटक कारणीभूत ठरला, याचा शोध घेतला जात आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने स्थानिक नागरिक स्तब्ध झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वेगमर्यादा पाळणे आणि रात्रीच्या प्रवासात अधिक सावधगिरी बाळगणे किती आवश्यक आहे, याची पुन्हा जाणीव करून देणारी ही घटना ठरली आहे.







