Pune Crime: पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एकतर्फी प्रेमातून एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग (Molestation case) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक (Arrest) केली आहे. भरदिवसा रस्त्यावर ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव समीर अकबर हाश्मी (वय 25, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर) असे आहे. पीडित तरुणी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी समीर हा गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. त्याने वारंवार तिचा पाठलाग करून बोलण्याचा आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरुणीने त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि स्पष्ट नकार दिला होता.
तरुणीने प्रतिसाद न दिल्यामुळे आरोपी समीर संतापला. त्याने तरुणीला रस्त्यात अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तिच्यावर हात उचलत मारहाण केली आणि तिचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी घाबरली. तिने ही बाब तातडीने आपल्या पालकांना सांगितली. त्यानंतर तरुणी पालकांसह लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि तक्रार नोंदवली.
तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी समीर हाश्मीला अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपीने यापूर्वीही तरुणीला त्रास दिला होता का, याची चौकशी केली जात आहे.
महिलांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नसून, महिलांना त्रास देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली आहे.







