पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्धारित ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजवणाऱ्यांविरोधात कोंढवा पोलिसांनी कारवाई केली आहे. मोहम्मदवाडीतील शंभू कॉलनी परिसरात गणपती स्थापना मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात प्लाझ्मा साऊंड सिस्टिमचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी साऊंड सिस्टिमसह ती वाहून नेणारा टाटा ७०९ ट्रक जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १४ लाख रुपये आहे.

ही कारवाई सोमवारी (१४ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोहम्मदवाडी येथील शेल पेट्रोल पंपाजवळ करण्यात आली. परिसरात मोठ्या आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती कोंढवा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी तंत्रज्ञाच्या मदतीने साऊंड सिस्टिमची तपासणी केली. त्यावेळी निर्धारित ध्वनीमर्यादेपेक्षा अधिक आवाजात प्लाझ्मा साऊंड सिस्टिमचा वापर केला जात असल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित डीजे साऊंड सिस्टिम आणि ती वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेला टाटा ७०९ ट्रक ताब्यात घेतला.

जप्त करण्यात आलेल्या ट्रकची किंमत सुमारे सात लाख रुपये असून, साऊंड सिस्टिमची किंमतही जवळपास सात लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या साऊंड सिस्टिममध्ये दोन बेस, दोन टॉप स्पीकर्स, मिक्स मशीन आणि प्लाझ्मा सिस्टिमचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलिसांकडून विविध भागांत लक्ष ठेवण्यात येत आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







