पुणे: केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या नियोजित विवाहासाठी तब्बल 17 कोटी रुपये खर्च होणार, दोन चार्टर्ड विमानं बुक करण्यात आली होती, अशा चर्चांना सियाचे वडील प्रवीण गोयल यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे. सियाला अटक झाल्यानंतर रुग्णालयातून प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी लग्नाच्या खर्चाबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रवीण गोयल म्हणाले की, उदयपूरमध्ये 23 ते 25 नोव्हेंबरदरम्यान लग्न समारंभाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, 17 कोटींचा महाल किंवा चार्टर्ड विमान बुक केल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. लग्नासाठी त्यांनी मर्यादित बजेट ठेवले होते आणि जास्तीत जास्त 5 कोटी रुपये खर्च करण्याचीच आपली आर्थिक क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या म्हणण्यानुसार, पाहुण्यांच्या मुक्कामासाठी त्यांच्या बाजूने सुमारे 70 खोल्या, तर अग्रवाल कुटुंबाकडून 150 ते 160 खोल्या आरक्षित करण्याचे नियोजन होते. निवास, जेवण आणि इतर कार्यक्रमांचा एकूण खर्च साधारण 3 कोटी रुपयांच्या आसपास जाणार होता.
प्रवीण गोयल यांनी चार्टर्ड विमानाच्या चर्चेवरही स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, जुलै-ऑगस्टमध्ये प्रवासाची व्यवस्था करण्याचा विचार होता. ट्रॅव्हल एजंटने काही पर्याय सुचवले होते. मात्र, मुंबई-उदयपूर आणि पुणे-उदयपूर हे पर्याय वेळ आणि खर्चामुळे योग्य वाटले नाहीत. त्यामुळे पुणे-अहमदाबाद विमानाने जाऊन तेथून कारने उदयपूरला जाण्याचा पर्याय विचारात होता. चार्टर्ड विमान बुक करण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता.
“मी स्वस्त दरात 20 ते 25 विमान तिकिटे घेण्याचा विचार करत होतो. माझ्या बजेटनुसार जास्तीत जास्त 5 कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले होते. 17 कोटींच्या लग्नाच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत,” असे प्रवीण गोयल यांनी स्पष्ट केले.







