पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lavande Areest) यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात न्यायालयाने त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. (Maharashtra Politics)

मिळालेल्या माहितीनुसार, विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात घुसखोरी होत असल्याचा दावा करत काही कीर्तनकारांची नावे जाहीर केली होती. या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर धार्मिक भावना दुखावल्याचा आणि द्वेष पसरवल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणात लवांडे यांना यापूर्वी अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र, प्रलंबित गुन्ह्यांची संपूर्ण माहिती न्यायालयासमोर न दिल्याचे कारण नमूद करत पुणे न्यायालयाने त्यांचे अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण रद्द केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
दरम्यान, विकास लवांडे यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. कोणत्या गुन्ह्यात अटक करण्यात आली याची स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी पोलिस कारवाईचे स्वागत केले. लवांडे यांनी वारंवार धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
यापूर्वी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक प्रकरणही घडले होते. त्या घटनेत काही जणांनी त्यांची गाडी अडवून शाईफेक केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणातही संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या विकास लवांडे यांच्यावरील प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.







