पुणे : नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांदळी गावातील कला केंद्रात नर्तकींच्या डान्सवरून दोन गटांत झालेल्या वादाला हिंसक वळण लागले. या वादातून कथितरित्या गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

अविनाश लक्ष्मण कोळेकर (वय ३०, रा. चाकण रोड, आळंदी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी कांदळी गावातील कला केंद्रात किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. नर्तकींच्या डान्सवरून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. वाद वाढल्यानंतर एका गटाकडून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी पिंपरी-चिंचवड परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ११ ऑगस्ट रोजी चाकण येथील रोहकाल फाटा परिसरातून अविनाश कोळेकर याला ताब्यात घेतले.

पोलिसांच्या चौकशीत कोळेकर याने कला केंद्रात गोळीबार केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी कोळेकरविरुद्ध उत्तर चाकण पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर जुन्नर आणि आळंदी पोलीस ठाण्यात यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







