पुणे : पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासह रुंदीकरणाची प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहेत. मंगळवारी आयुक्तांनी विमानतळाकडे जाणाऱ्या विविध रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

विमाननगर परिसरातील व्हीव्हीआयपी रोड, सिम्बायोसिस रस्ता आणि शुभ चौक परिसरातील हातगाड्या, फेरीवाले तसेच साइड मार्जिनमध्ये झालेल्या अतिक्रमणांची आयुक्तांनी पाहणी केली. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी ठरावीक ठिकाणे निश्चित करून नियमितपणे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर आणि ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त तुषार बाबर, पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नागपूर चाळ, जेल रोड पोलीस चौकी ते ५०९ चौक आणि विकफिल्ड चौक मार्गे पुणे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. या मार्गावरील प्रलंबित कामे पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.

तसेच ५०९ चौकातून हवाई दलाच्या हद्दीतून धानोरी मुख्य रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गाबाबतही चर्चा करण्यात आली. या कामाला गती देण्यासाठी एअर फोर्स स्टेशन, लोहगाव येथील अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
पुण्यात शिक्षण, रोजगार आणि पर्यटनासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने नागरिक येतात. त्यामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत ठेवणे महत्त्वाचे आहे. या मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे कमी करून रस्त्यांचे रुंदीकरण व सुशोभीकरण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.
या कामांमुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता अतिक्रमण हटविण्याची कारवाई आणि रुंदीकरणाची प्रलंबित कामे किती वेगाने पूर्ण होतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.






