तळेगाव: कामाच्या ठिकाणी झालेल्या अपमानाचा राग मनात ठेवून एका कामगाराने आपल्या सुपरवायझरची हत्या केल्याची धक्कादायक घटना तळेगाव एमआयडीसी परिसरात उघडकीस आली आहे. मुलासाठी खरवस आणायचा आहे, असे सांगून आरोपीने सुपरवायझरला निर्जन ठिकाणी नेले. तेथे आधीच लपवून ठेवलेल्या कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. हत्येनंतर तो घरी जाऊन झोपल्याचेही समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

योगेश भांमरे असे हत्या झालेल्या सुपरवायझरचे नाव असून, सिद्धेश साळुंखे असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. हे दोघेही तळेगाव एमआयडीसीतील एकाच कंपनीत काम करत होते. सिद्धेश कामात हलगर्जीपणा करत असल्याने योगेश यांनी त्याला एकदा कानशिलात लगावली होती. तसेच त्याला शिवीगाळही केली होती. या प्रकारामुळे सिद्धेशच्या मनात राग निर्माण झाला होता. याच कारणातून त्याने हत्येचा कट आखल्याचा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येच्या दोन दिवस आधी योगेश यांनी आपल्या मुलाला खरवस खायचे असल्याचे सिद्धेशला सांगितले होते. त्यानंतर खरवस आणण्यासाठी जाऊया, असे सांगून सिद्धेशने त्यांना रविवारी बोलावले. गाडी उर्से टोलनाक्याजवळ उभी करून आरोपीने त्यांना दुचाकीवरून ओझर्डे येथील निर्जन भागात नेले. तेथे गोठा असल्याचे सांगत तो त्यांना पुढे घेऊन गेला.

या ठिकाणी आरोपीने आधीच कोयता लपवून ठेवल्याचा तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे. योगेश पुढे चालत असताना सिद्धेशने त्यांच्या पाठीमागून कोयत्याने वार केले. या हल्ल्यात योगेश यांचा मृत्यू झाला. हत्येनंतर तो घरी जाऊन झोपल्याचेही समोर आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य माहितीच्या आधारे सिद्धेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याचा नेमका सहभाग काय होता, याचा तपास सुरू आहे.






