पुणे: पुण्याच्या आंबेठाण परिसरात ऊसतोडीच्या कामासाठी घेतलेल्या उचलीच्या पैशाच्या वादातून एका तरुणाचे दुचाकीसह अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तरुण दुचाकीवरून जात असताना तीन ऑटो रिक्षा आणि एका कारमधून आलेल्या काही जणांनी त्याला अडवून दुचाकीसह त्याचे अपहरण केले. याप्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर उत्तर म्हाळुंगे एमआयडीसी आणि म्हाळुंगे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तरुणाची सुखरूप सुटका करून आठ जणांना अटक केली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आंबेठाण आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात आला. सुरुवातीला अमोल, सचिन आणि नीलेश या तिघांना शिक्रापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर अपहरणाच्या घटनेमागील इतर संशयितांची तसेच अपहृत तरुणाबाबत माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांच्या तपासात ऊसतोडीच्या कामासाठी घेतलेल्या उचलीच्या पैशांच्या व्यवहारातून हा वाद निर्माण झाल्याचे समोर आले. त्यातून संबंधित तरुणाचे दुचाकीसह अपहरण करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यात कारवाई करून आठ संशयितांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अमोल रामराव राठोड (२९), सचिन रामराव राठोड (२५), नीलेश संतोष राठोड (२७), शुभम प्रल्हाद जाधव (२५), संदीप गुलाब राठोड (४२), इंदल थावरा जाधव (४०, सर्व रा. दिंडाळा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ), राजू बापूराव चव्हाण (४४, रा. वरूड बेबी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) आणि संदीप उदयभान जाधव (३२, रा. नाईकनगर तांडा, ता. हदगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली कार, तीन ऑटो रिक्षा आणि अपहृत तरुणाची मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि सहायक पोलीस आयुक्त प्रिया डुमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहायक निरीक्षक कल्याण घाडगे, सहायक फौजदार यदु आढारी, पोलीस अंमलदार विठ्ठल वडेकर, अनिल गोरड, भैरोबा यादव, संतोष काळे आणि बापूराव सोनपसारे यांनी केली.







