पुणे: पुण्यात बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणी मागण्याच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, उत्तमनगर परिसरातील एका कापड व्यावसायिकाला 2 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे 47 वर्षीय कापड व्यावसायिक असून बांधकाम व्यवसायातही कार्यरत आहेत. त्यांचे कार्यालय नर्हे येथे असून ते उत्तमनगर-शिवणे मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी आहेत. शनिवारी सकाळी त्यांच्या मोबाईलवर इंटरनेट कॉलद्वारे धमकीचा फोन आला.

फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख ‘शुभम लोणकर’ अशी करून दिली. त्याने तक्रारदारांच्या बांधकाम व्यवसायाची, कारच्या नोंदणी क्रमांकाची, दैनंदिन हालचालींची तसेच कुटुंबीयांची माहिती असल्याचा दावा केला. “स्वतःची काळजी घ्या,” असा इशारा देत जीवे मारण्याची धमकी दिली आणि 2 कोटी रुपये तयार ठेवण्यास सांगितले. पुढील सूचना लवकरच दिल्या जातील, असेही त्याने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
धमकी मिळाल्यानंतर व्यावसायिकाने तात्काळ उत्तमनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी त्यांच्या दुकान, निवासस्थान आणि नर्हे येथील कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
उत्तमनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी या प्रकरणाचा गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू असल्याची माहिती दिली.
दरम्यान, पुणे शहरात बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणी मागण्याची ही आठवड्यातील तिसरी घटना आहे. यापूर्वी वानवडीतील एका उद्योगपतीकडे 50 कोटी रुपयांची, तर वडकी येथील औषध घाऊक विक्रेत्याकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. तसेच पिंपरी-चिंचवडमध्येही अशाच प्रकारची तक्रार दाखल झाल्याने व्यापारी आणि उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.







