पुणे : कोथरूड परिसरात एका तृतीयपंथीयाला कथितपणे धर्मांतरासाठी दबाव आणून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तसेच, धमकावून घरातील सहा लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याचा आरोप नऊ तृतीयपंथीयांवर करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध दरोडा, धमकावणे आणि धर्मस्वातंत्र्य कायद्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय तक्रारदार तृतीयपंथी कोथरूड परिसरातील एका मंदिराजवळ राहतो. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास नऊ आरोपी त्याच्या घरात शिरले. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराच्या धर्माबाबत अपमानास्पद वक्तव्य करत धर्म बदलून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. त्याला पट्टा आणि बांबूने मारहाण करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तसेच, भिक्षेतून मिळणाऱ्या उत्पन्नातील ५० टक्के वाटा न दिल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तक्रारदाराला धमकावून घरातील सहा लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी नऊ तृतीयपंथीयांविरुद्ध दरोडा, धमकावणे, महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ मधील संबंधित कलमे आणि तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके आणि पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







