पुणे: पुणे जिल्ह्यातील कासारसाई येथे दारू पिल्यानंतर झालेल्या वादातून एका व्यक्तीची दगडाने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास कासारसाई-कूसगाव रस्त्यावरील कृष्ण मंदिरासमोरील वन विभागाच्या जागेत हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

हनुमंत सोपान शितोळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मयूर शितोळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जयवंता भगवंत तिडके या महिलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हनुमंत शितोळे आणि आरोपी महिला हे दोघेही कासारसाई परिसरात एकत्र दारू पीत होते. दारू पिल्यानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर हनुमंत यांनी जयवंता तिडके यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांचा हात पिरगाळल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकाराचा राग मनात धरून जयवंता तिडके यांनी तेथे पडलेला दगड उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी हनुमंत यांच्या डोक्यात आणि छातीत दगडाने जोरदार वार केले. या हल्ल्यात हनुमंत गंभीर जखमी झाले. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या हत्येमागील नेमकी परिस्थिती आणि घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.







