पिंपरी-चिंचवड : शहरातील हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत असतानाच चिखली परिसरातून आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी संगनमताने एका तरुणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एका महिला आरोपीने तरुणाच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तरुणाने प्रसंगावधान राखत वार चुकवल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना सोमवारी (१६ नोव्हेंबर) रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास चिखली-नेवाळेवस्ती येथील ‘ऐश्वर्यम कोर्टयार्ड’ इमारतीजवळ घडली. जुन्या वादाचा राग मनात धरून चार जणांनी फिर्यादी विजय सातपुते (वय २६, रा. चिखली) यांना गाठले. यावेळी एका महिला आरोपीने त्यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सातपुते यांनी वेळीच वार चुकवल्याने त्यांचा जीव वाचला.
या घटनेनंतर विजय सातपुते यांनी चिखली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी एका महिलेसह विशाल डाबेराव (वय २३, रा. मोरेवस्ती), साहिल अतुल महिंद्र (वय १८, रा. घरकुल, चिखली) आणि मोहित या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







