पुणे: पुण्यातील चंदननगर परिसरात हुंडा आणि पैशांच्या मागणीमुळे एका 25 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततचा मानसिक आणि शारीरिक छळ सहन करत अखेर तिने गळफास घेऊन जीवन संपवल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मृत महिलेचे नाव तेजस्विनी गोरख सोनवणे असे असून तिच्या वडिलांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, तेजस्विनीचा विवाह 25 जून 2020 रोजी झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत होते. या दाम्पत्याला अडीच वर्षांची मुलगीही आहे.
मात्र, काही काळानंतर सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी आणि इतर मागण्यांसाठी त्रास दिला जाऊ लागल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, वेळोवेळी चारचाकी वाहन, फ्लॅट खरेदीसाठी पैसे आणि इतर वस्तूंची मागणी करण्यात येत होती. मागण्या पूर्ण न झाल्यास तेजस्विनीला मानसिक त्रास देणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण करणे असे प्रकार घडत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

एप्रिल 2026 मध्ये फ्लॅट खरेदीसाठी 3 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतरही तेजस्विनीवर दबाव कायम ठेवण्यात आला. तसेच अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘धोंडा’ जेवणासाठी येण्यापूर्वी सासरच्या मंडळींनी सोन्याची अंगठी देण्याची अट घातल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. अंगठी दिली तरच जेवणासाठी येऊ, अन्यथा येणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे म्हटले आहे. त्यानंतर जेवणाच्या कार्यक्रमातही वाद घालून तेजस्विनीचा अपमान करण्यात आल्याचा आरोप आहे.

या सततच्या त्रासामुळे तेजस्विनी मानसिक तणावाखाली होती. 2 जून 2026 रोजी रात्री तिच्या पतीने माहेरच्या नातेवाईकांना फोन करून ती खोलीचे दार उघडत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.







