पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पुण्यात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. मात्र, या गर्दीचा फायदा घेत चोरटेही सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. दगडूशेठ गणपतीच्या दर्शन रांगेत तसेच बेलबाग चौक परिसरात गर्दीचा फायदा घेत एका ४६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेण्यात आले. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्तनगर परिसरात राहणारी ४६ वर्षीय महिला १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास कुटुंबीयांसोबत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी आली होती. गणेशोत्सवामुळे बुधवार पेठेतील बेलबाग चौक परिसरात मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी रांगेत उभे असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.

चोरीला गेलेले मंगळसूत्र १४.९०० ग्रॅम वजनाचे असून त्याची किंमत ९३ हजार २३३ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. काही वेळाने गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या घटनेनंतर फरासखाना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्याची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात शहरातील अन्य गर्दीच्या ठिकाणीही चोरीच्या घटना घडल्या आहेत. कात्रज येथील नवीन बस थांब्यावर बस क्रमांक ४२ मध्ये चढत असताना एका १८ वर्षीय तरुणाचा ८२ हजार ९०० रुपये किमतीचा आयफोन चोरीला गेला. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच डांगे चौक ते भेकराईनगर मार्गावरील बसमधून हडपसर गाडीतळ येथे उतरताना एका ५७ वर्षीय महिलेच्या हातातील ७० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी चोरीला गेली. या प्रकरणी हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात दर्शन रांगेत तसेच सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना नागरिकांनी मोबाईल, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.







