सागर जगदाळे

भिगवण (प्रतिनिधी) : बारामती तालुक्यातील जल जीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांबाबत निंबोडी ग्रामपंचायतीने उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नांना आता प्रत्यक्ष स्थळपाहणीची जोड मिळाली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष मोहन सोनवणे यांनी कामातील कथित अनियमितता आणि निकृष्ट दर्जाबाबत त्रयस्थ समितीमार्फत सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पाहणी केली. यावेळी पाइपलाइनची खोली, अंदाजपत्रकानुसार झालेली खोदाई आणि कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची दखल घेण्यात आल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

जल जीवन मिशन पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता नाडगौडा, जल जीवन मिशन बारामतीचे उपअभियंता जगताप आणि शाखा अभियंता कुंभार यांनी संबंधित कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान काम निकृष्ट व बोगस दर्जाचे झाल्याचे कार्यकारी अभियंता नाडगौडा यांनी मान्य केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत नोंद किंवा स्वतंत्र तांत्रिक अहवाल अद्याप समोर आलेला नसल्याने, कामाच्या दर्जाबाबत अंतिम निष्कर्ष अधिकृत चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

ग्रामस्थांनी खोदून दाखवली पाइपलाइन; खोलीबाबत प्रश्नचिन्ह
पाहणीदरम्यान जल जीवन मिशनची पाण्याची पाइपलाइन गटाराच्या लाईनमध्ये टाकण्यात आल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदवला. काही ठिकाणी पाइपलाइन अर्ध्या फुटाच्या खोलीवर, तर काही ठिकाणी एक फुटाच्या खोलीवर असल्याचे ग्रामस्थांनी प्रत्यक्ष खोदाई करून दाखवले. पाइपलाइनची खोली मंजूर अंदाजपत्रकानुसार आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
ग्रामस्थांनी दाखवून दिलेल्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कामातील त्रुटींची दखल घेतल्याचे सांगण्यात आले. अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार खोदाई झाली नसल्याचा मुद्दाही यावेळी पुढे आला. यापुढील काम अधिक दर्जेदार पद्धतीने करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्याचे ग्रामपंचायतीकडून नमूद करण्यात आले.
सहा गावांतील योजनांच्या चौकशीची मागणी
सरपंच संतोष मोहन सोनवणे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP), पुणे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार दाखल करून तत्कालीन उपअभियंत्यांच्या कार्यकाळातील कामांची त्रयस्थ समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
जैनवाडी, सावळ, कटफळ, पारवडी, निंबोडी आणि शिरसुफळ या गावांतील मंजूर, राबविण्यात आलेल्या तसेच अपूर्ण दाखविलेल्या योजनांच्या कामांची तांत्रिक व प्रशासकीय तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या चौकशीमध्ये मंजूर कामांचे मूळ अंदाजपत्रक, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, कंत्राट वाटप, मोजमाप पुस्तिकेतील नोंदी, साहित्याचे गुणवत्ता अहवाल आणि प्रत्यक्ष स्थळावरील काम यांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. कामे अपूर्ण किंवा निकृष्ट असतानाही बिले मंजूर झाली आहेत का, याचीही तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांच्या ग्वाहीनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा
जल जीवन मिशनच्या कामांबाबत ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या तक्रारींची तांत्रिक तपासणी करून प्रत्यक्ष कामाचा दर्जा आणि अंदाजपत्रकातील तरतुदी यांची पडताळणी होणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी यापुढील काम दर्जेदार करण्याची ग्वाही दिल्याने, या आश्वासनाची अंमलबजावणी कशी होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. त्रयस्थ समितीमार्फत चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून कायम ठेवण्यात आली आहे. या पाहणी दरम्यान सिद्धेश्वर निंबोडी ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष सोनवणे, उपसरपंच पूनम सोनवणे, सदस्य नामदेव बाड, तुषार सवाने, गणेश खंडागळे, तुषार शिरसागर, मंगेश खंडागळे, सलीम मुलानी तसेच ग्रामपंचायत अधिकारी अनिल जगताप हे उपस्थित होते






