लोणी काळभोर, ता. 17 : दुर्मिळ आजाराशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या गार्गीच्या उपचारांसाठी तब्बल 9 कोटी रुपयांची गरज असल्याने तिच्या मदतीसाठी समाजातील विविध स्तरांतून मदतीचे हात पुढे येत आहेत. याच सामाजिक बांधिलकीतून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील हॉटेल आई जगदंबने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ग्राहकांच्या प्रत्येक थाळीमागे 10 रुपये गार्गीच्या उपचारांसाठी बाजूला ठेवले जात आहेत.

दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून, दररोज सुमारे 200 ते 300 थाळ्यांची विक्री होत आहे. प्रत्येक थाळीमागे 10 रुपये याप्रमाणे दररोज सुमारे दोन ते तीन हजार रुपये गार्गीच्या मदतीसाठी जमा होत आहेत. ही रक्कम एकत्रित करून गार्गीच्या उपचारांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती हॉटेलचे मालक लालासाहेब यादव चौधरी यांनी दिली.

“गार्गीला वाचवण्यासाठी आपल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा हा प्रयत्न आहे. ग्राहकांनी घेतलेल्या प्रत्येक थाळीतून 10 रुपये तिच्या उपचारांसाठी दिले जात आहेत. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे,” असे आवाहन लालासाहेब यादव चौधरी यांनी केले.

गार्गी सध्या अत्यंत दुर्मिळ आणि गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तिच्या उपचारांसाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार तब्बल 9 कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे आव्हानात्मक असताना, समाजातील दानशूर व्यक्ती आणि नागरिकांच्या मदतीतून हा निधी उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, गार्गीच्या उपचारांसाठी सुरू असलेल्या या मोहिमेला ‘आई जगदंब’ हॉटेलने दिलेला हातभार हा केवळ आर्थिक मदत नसून, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा प्रत्यय देणारा उपक्रम ठरत आहे.
गंभीर आणि दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी मोठ्या आर्थिक खर्चाची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत सामूहिक निधी संकलनासह सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. समाजातील संवेदनशील नागरिकांनी एकत्र येऊन मदतीचा हात दिल्यास गार्गीच्या उपचारांसाठी आवश्यक निधी उभारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी गार्गीच्या उपचारांसाठी पुढे येऊन शक्य ती मदत करावी.
— पृथ्वीराज काकडे, सामाजिक कार्यकर्ते, थेऊर (ता. हवेली)






