पुणे : शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील एका व्यावसायिकाची तब्बल ९५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन तरुणांनी व्यावसायिकाशी ओळख वाढवून त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीतून दरमहा पाच ते दहा टक्के परतावा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्यावसायिकाने एक कोटीहून अधिक रुपये गुंतवले. मात्र, त्यानंतर पैसे परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे समोर आले.

या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अक्षय दिलीप ननावरे (वय २७, रा. ससाणेनगर, हडपसर) आणि दीपक सुधारक चौधरी (वय ३३, रा. उत्तमनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकाची आरोपींसोबत ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत दोघांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीची माहिती देत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. पैसे गुंतवल्यास दरमहा पाच ते दहा टक्के नफा मिळेल, असे सांगून त्यांनी व्यावसायिकाला गुंतवणुकीसाठी तयार केले.

व्यावसायिकाचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला २५ लाख रुपये नफा म्हणून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींच्या सांगण्यावर अधिक विश्वास बसल्यानंतर व्यावसायिकाने त्यांच्याकडे आणखी मोठी रक्कम दिली.
एक कोटीहून अधिक रुपये गुंतवल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. अपेक्षेप्रमाणे परतावा मिळाला नाही आणि गुंतवलेली रक्कमही परत करण्यात आली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाच्या लक्षात आले. या संपूर्ण प्रकारात त्यांना सुमारे ९५ लाख रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी अक्षय ननावरे आणि दीपक चौधरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी आणखी कोणाची अशाच पद्धतीने फसवणूक केली आहे का, तसेच या प्रकरणातील आर्थिक व्यवहार आणि इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.







