पुणे: पुण्यातील एरंडवणे परिसरात राहणाऱ्या ७४ वर्षीय डॉक्टर महिलेची सायबर चोरट्यांनी बँकेच्या नावाखाली तब्बल २ लाख ७८ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ऑनलाइन बँकिंग सुविधा सुरू करून देण्याचे आमिष दाखवत चोरट्यांनी महिलेच्या मोबाईलवर एपीके (APK) फाइल पाठवली. ही फाइल उघडताच त्यांनी मोबाईलचा तांत्रिक ताबा मिळवून बँक खात्यातील रक्कम लंपास केली. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला एरंडवणे येथील एका सोसायटीत राहतात. १० जून रोजी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. संबंधिताने स्वतःला बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत ऑनलाइन बँकिंग सुविधा सुरू करून देण्याची माहिती दिली. यासाठी बँकेत येण्याची आवश्यकता नसल्याचे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला.

यानंतर आरोपीने ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलेच्या मोबाईलवर एक APK फाइल पाठवली. महिलेने ती फाइल उघडल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळवला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ७८ हजार रुपये परस्पर वळवून घेतल्याचे समोर आले.
फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीने पाठवलेली APK फाइल किंवा लिंक उघडू नये, तसेच बँकेच्या नावाने आलेल्या फोनवर वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती शेअर करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






