पुणे : पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणाला पिस्तूल रोखून बांबूने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीत हा प्रकार घडला. प्रतिस्पर्धी गटातील तरुणांसोबत मैत्री का ठेवतोस, असा जाब विचारत १९ वर्षीय तरुणाला धमकावून मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी खंडू म्हात्रे (वय १९, रा. मीनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) याने याबाबत तक्रार दिली आहे. २७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास सनी वसाहतीजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपी तेथे आले. त्यांनी सनीला प्रतिस्पर्धी गटातील तरुणांसोबत का फिरतोस, असा जाब विचारत त्याच्याशी वाद घातला.

वाद वाढल्यानंतर आरोपींपैकी एकाने पिस्तूल काढून सनीच्या डोक्यावर रोखल्याचा आरोप आहे. त्यानंतर इतर आरोपींनी बांबूने सनीला मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेत आरोपींनी पिस्तूलातून गोळीबार केल्याची चर्चा परिसरात आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार गोळी झाडण्यात आली होती, मात्र ती सनीला लागली नाही. मात्र, स्वारगेट पोलिसांनी दाखल केलेल्या अधिकृत तक्रारीत गोळीबाराचा उल्लेख नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गोळीबाराबाबत सध्या अधिकृत पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत असून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे.







