पुणे : शेतजमीन खरेदी करणे हा भविष्यासाठी गुंतवणुकीचा एक पर्याय मानला जातो. मात्र, जमिनीच्या व्यवहारात निष्काळजीपणा केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. अनेकदा अपुरी माहिती, कागदपत्रांची पडताळणी न करणे किंवा घाईघाईने व्यवहार करणे यामुळे खरेदीदार अडचणीत सापडतात. त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे तपासून कायदेशीर बाबींची खात्री करणे महत्त्वाचे आहे.

जमीन खरेदी करताना सर्वप्रथम सातबारा उतारा तपासावा. या उताऱ्यावर जमिनीचे क्षेत्रफळ, खातेदाराचे नाव, पिकांची नोंद आणि इतर हक्कांसंबंधी माहिती उपलब्ध असते. संबंधित जमिनीचा अद्ययावत सातबारा पाहून त्यावरील नोंदींची खात्री करावी. मात्र, केवळ सातबारा उताऱ्याच्या आधारे मालकी हक्काचा अंतिम निर्णय घेऊ नये.

जमिनीच्या मालकीमध्ये यापूर्वी झालेले बदल समजून घेण्यासाठी फेरफार नोंदी तपासणे आवश्यक आहे. खरेदी-विक्री, वारसाहक्क किंवा बक्षीसपत्रामुळे झालेल्या बदलांची माहिती या नोंदींमध्ये मिळते. त्यामुळे जमिनीचा मालकी हक्काचा इतिहास समजण्यास मदत होते.

जमिनीचा अधिकृत नकाशा तपासणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भूमी अभिलेख विभागाकडून मिळणाऱ्या नकाशाच्या आधारे जमिनीची हद्द आणि प्रत्यक्ष जागेवरील मोजणी यांची पडताळणी करता येते. यामुळे भविष्यात शेजारील जमीनमालकांशी सीमांवरून होणारे वाद टाळण्यास मदत होते.
याशिवाय आठ-अ उतारा तपासून संबंधित खातेदाराच्या जमीन खात्याची माहिती घ्यावी. जमिनीवरील कर्ज, बोजा किंवा इतर दावे आहेत का, याची स्वतंत्रपणे खात्री करावी. जमीन विकणाऱ्या व्यक्तीकडे मालकी हक्क कसा आला, हे समजण्यासाठी मूळ खरेदीखत आणि मागील मालकीची कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे.
जमिनीच्या व्यवहारापूर्वी अनुभवी वकिलाकडून सर्व कागदपत्रांची कायदेशीर तपासणी करून घ्यावी. तसेच जमिनीवर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करावी आणि आवश्यक परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्रे व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. केवळ दलालांच्या आश्वासनांवर विश्वास न ठेवता सर्व माहितीची खात्री केल्यानंतरच पैशांची देवाणघेवाण करावी. योग्य खबरदारी घेतल्यास फसवणुकीचा धोका कमी होऊ शकतो.






