पुणे, ता. 25 : पुणे न्यायालयाच्या परिसरात बुधवारी (ता. 25) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्यात संबंधित व्यक्तीचे हात आणि कान गंभीररीत्या जखमी झाल्याचे समजते.

विशेष म्हणजे, हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळी पिस्तूल टाकून पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी पिस्तूल हस्तगत केल्याचे समजते. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ला झालेली व्यक्ती गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती समोर येत असून, हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणातून केला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून, हल्लेखोरांचा शोध आणि घटनेमागील कारणांचा तपास सुरू आहे. न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.







