पुणे: पुणेकरांच्या वाहनांची ओळख असलेली ‘MH 12’ ही नोंदणी मालिका लवकरच बदलणार असली, तरी पुण्याची ही हक्काची ओळख कायम राहणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देशातील पहिली अंक-अक्षरी म्हणजेच ‘Digit-Letter’ वाहन नोंदणी मालिका सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे ‘MH 12’ हा कोड कायम ठेवून त्यापुढे अंक आणि अक्षरांच्या नव्या संयोजनातून वाहनांना नोंदणी क्रमांक देण्याचा प्रस्ताव आहे.

सध्या पुणे आरटीओमध्ये ‘MH 12’ अंतर्गत ‘ZZ’ ही शेवटची अक्षरी मालिका सुरू आहे. उपलब्ध क्रमांकांची ही मालिका लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने तीन अक्षरी मालिका सुरू करण्याची तरतूद नसल्याने वाहनांच्या नवीन नोंदणी क्रमांकाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर यावर पर्याय शोधला जात आहे.

या समस्येवर तोडगा म्हणून पुणे आरटीओकडून ‘MH 12 1A’ किंवा ‘MH 12 A1’ अशा स्वरूपाची अंक-अक्षरी मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही प्रणाली लागू झाल्यास पुणे शहराचा ‘MH 12’ हा कोड कायम राहणार असून, वाहनांच्या वाढत्या संख्येसाठी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त क्रमांक उपलब्ध होतील.

दरम्यान, नवीन मालिका अधिकृतपणे लागू होईपर्यंत वाहन खरेदी करणाऱ्या पुणेकरांना ‘MH 61’ या कोडअंतर्गत तात्पुरती नोंदणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात नवीन वाहने घेणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन अंक-अक्षरी मालिका सुरू झाल्यानंतर निर्धारित शुल्क भरून ‘MH 61’ अंतर्गत नोंदणी झालेली वाहने ‘MH 12’च्या नव्या मालिकेत वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
‘MH 61’ हा तात्पुरता कोड लागू होणार असल्याने पुणेकरांमध्ये आपल्या शहराची ‘MH 12’ ही ओळख कायम राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. हा मुद्दा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडला. पुण्याची ‘MH 12’ ही ओळख जपण्याची मागणी गडकरी यांनी सकारात्मकतेने स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
आता पुढील प्रक्रियेत प्रस्तावित नव्या नोंदणी पद्धतीबाबत अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात येणार आहे. नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागवल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
नवीन अंक-अक्षरी प्रणाली लागू झाल्यास पुण्याची जुनी ‘MH 12’ ओळख कायम राहण्यासोबतच वाढत्या वाहनसंख्येला सामावून घेण्यासाठी आरटीओला मोठ्या प्रमाणात नवीन नोंदणी क्रमांक उपलब्ध होणार आहेत.








