पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे विमान (Baramati Airport) बारामती विमानतळावर कोसळून त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर या दुर्घटनेभोवती अनेक प्रश्न (Ajit Pawar Plane Crash) उपस्थित होत आहेत. आमदार रोहित पवार यांनी हा अपघात नसून घात असू शकतो, असा संशय व्यक्त केला आहे. त्याचवेळी बारामती विमानतळावरील पायाभूत सुविधांबाबत गंभीर त्रुटी असल्याची माहिती समोर आली आहे. (Breaking News)

महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडून गेल्या वर्षी बारामती येथील वैमानिक प्रशिक्षण केंद्राचे सविस्तर ऑडिट करण्यात आले होते. या अहवालात नियमभंग आणि सुरक्षेतील त्रुटींची मोठी यादी नमूद करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हा अहवाल राज्यातील संबंधित यंत्रणांकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्यानंतर कोणती दुरुस्ती किंवा सुधारणा करण्यात आली का, याबाबत स्पष्टता नाही.
अहवालानुसार बारामती येथे पूर्ण क्षमतेचा नागरी विमानतळ नसून मुख्यतः वैमानिक प्रशिक्षणासाठीची सुविधा आहे. येथील धावपट्टी सुमारे 1700 मीटरची असून मोठ्या जेट विमानांसाठी साधारणपणे 2500 मीटर लांबीची धावपट्टी आवश्यक मानली जाते. त्यामुळे ही जागा नियमित व्यावसायिक उड्डाणांसाठी सक्षम आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याशिवाय येथे शासकीय एटीसी कंट्रोल टॉवर नसल्याचे सांगितले जाते. नियंत्रण व्यवस्था खासगी एव्हिएशन कंपन्यांकडे असल्याची माहिती आहे. विमानतळाला पूर्ण संरक्षक कंपाउंड वॉल नसणे, आवश्यक वॉच टॉवरची कमतरता अशा सुरक्षाविषयक बाबीही अहवालात नमूद करण्यात आल्या होत्या, असे समजते.
या पार्श्वभूमीवर अपघातामागील तांत्रिक कारणे, हवामान, विमानाची स्थिती आणि विमानतळाच्या सुविधा या सर्वांचा सखोल तपास होणे अत्यावश्यक ठरत आहे. कारण हा केवळ एका नेत्याचा मृत्यू नसून राज्यातील विमान सुरक्षेच्या व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित करणारी घटना आहे.







