पुणे: कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (Bandu Andekar) आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक (Pune Mahapalika Election) लढवण्याच्या तयारीत असल्याने शहराच्या राजकारणात मोठी (Vanraj Andekar) खळबळ उडाली आहे. बंडू आंदेकरसोबतच त्याच्याच (Lakshmi Andekar) कुटुंबातील माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हेदेखील (Andekar Gang Pune) निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. नातवाच्या खुनाच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला बंडू आंदेकर आज तुरुंगाबाहेर येऊन उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसून आला. (Latest Marathi News)

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आंदेकर कुटुंब इच्छुक असून, तिघांनाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आज पोलीस संरक्षणात बंडू आंदेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्यासाठी विशेष पोलीस एस्कॉर्ट व्हॅन देण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

तुरुंगाबाहेर येताना बंडू आंदेकरने काळ्या कपड्याने चेहरा झाकलेला होता. मात्र व्हॅनमधून उतरताच त्याने हात वर करून व्हिक्टरी साईन दाखवला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाताना त्याने जोरदार घोषणा दिल्याचेही पाहायला मिळाले. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांनीही आपला चेहरा स्कार्फने झाकलेला होता. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने निवडणूक लढवण्याची परवानगी दिली असली, तरी लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या तिघांनाही न्यायालयीन कोठडीत राहावे लागत आहे. जामीन नाकारला असला तरी निवडणूक लढवण्याचा त्यांचा अधिकार कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आंदेकर कुटुंब ही निवडणूक थेट जेलमधून लढवणार आहे.
आंदेकर कुटुंबाने उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या काळात त्यांचा प्रचार कसा होणार आणि मतदारांचा प्रतिसाद काय असेल, याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले आहे.






