पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१), ३७ (२) आणि ३७ (३) अंतर्गत हे आदेश जारी करण्यात आले असून ते २१ जुलै रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.

पोलीस उपआयुक्त यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचे मोर्चे, धरणे, आंदोलने, बंद, उपोषणे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आदेशानुसार, पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमणे, सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. तसेच स्फोटके, ज्वलनशील पदार्थ, दगड, तलवारी, भाले, काठ्या, सळ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा पोहोचवू शकणारी इतर साधने बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे.
याशिवाय कोणत्याही व्यक्ती, नेते किंवा चिन्हाचे पुतळे प्रदर्शित करणे किंवा जाळणे, चिथावणीखोर किंवा आक्षेपार्ह घोषणा देणे, सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे करणे तसेच सार्वजनिक शांतता, नैतिकता किंवा राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे पोस्टर्स, बॅनर्स किंवा अन्य साहित्य प्रदर्शित करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावर रील्स किंवा अन्य माध्यमांद्वारे दहशत पसरवणे, धमक्या देणे, गुन्ह्यांचे उदात्तीकरण करणे किंवा अशा स्वरूपाचा मजकूर प्रसारित केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, शासकीय कर्तव्य बजावणारे कर्मचारी, कायदेशीररीत्या शस्त्र बाळगण्याची परवानगी असलेले अधिकारी तसेच ३.५ फूट लांबीपर्यंतची काठी बाळगणारे खासगी सुरक्षा रक्षक आणि पहारेकरी यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.
पुणे पोलिसांनी नागरिकांना प्रतिबंधात्मक आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.







