पुणे : बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पोलिसांनी न्यायालयात आपले म्हणणे सादर न केल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाने पुढील सुनावणी २२ जुलै रोजी ठेवली आहे.

या प्रकरणात रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडली नसल्याने सुनावणी होऊ शकली नाही. न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली असून बुधवारी या प्रकरणावर सविस्तर सुनावणी होणार आहे.

याबाबत अॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांनी सांगितले की, अर्ज शनिवारी दाखल करण्यात आला होता. रविवारी सुट्टी असल्याने सोमवारी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी जाणीवपूर्वक आपली भूमिका मांडली नाही. एवढेच नव्हे, तर म्हणणे सादर करता येत नसल्याचे कोणतेही लेखी कारणही न्यायालयाला दिले नाही. त्यामुळे न्यायालयाने पोलिसांना एक दिवसाची संधी देत २२ जुलै रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ तयार करून रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह अनेकांना आपल्या मृत्यूस जबाबदार धरले होते. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात धंगेकर दाम्पत्यासह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.







