पुणे: पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हडपसर आणि वाकडेवाडी परिसरात केलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये सुमारे ७ लाख ८८ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत अफूच्या बोंडाचा चुरा आणि गांजाचा मोठ्या प्रमाणावर साठा सापडला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

हडपसरमध्ये राजस्थानच्या दोघांना अटक
हडपसर परिसरातील मांजरी येथे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या राजस्थानमधील दोन आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांची नावे राकेश अर्जुनदास रामावत (वय ४१) आणि ताराचंद सीताराम जहाँगीर (वय २६) अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन किलो अफूच्या बोंडांचा चुरा, अंदाजे २ लाख १५ हजार ५०० रुपये किंमतीचा, मुद्देमाल जप्त करण्यात आला. मांजरी रस्त्यावर गस्त घालणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
वाकडेवाडीत तिघांकडून गांजा जप्त
मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी परिसरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी भागवत शिवाजी मंडलिक (वय २६, रा. रहाटणी), मुसीम सलीम शेख (वय २६) आणि महेश नारायण कळसे (वय २४, दोघे रा. शिरुर कासार, जि. बीड) हे असून, त्यांच्याकडून अंदाजे ५ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा २१ किलो गांजा, जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे आणि सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड, तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.







