पुणे: पुण्यात CNG वापरणाऱ्या वाहनधारकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. शहरात CNG च्या दरात प्रति किलो 1 रुपयांची वाढ करण्यात आली असून ही नवी दरवाढ मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. त्यामुळे CNG चा दर 94.75 रुपयांवरून वाढून 95.75 रुपये प्रति किलो झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. इराण आणि अमेरिकेमधील तणाव कमी झाल्याचे चित्र असले तरी इंधनाच्या दरांमध्ये अपेक्षित घट झालेली नाही. उलट CNG च्या किमतीत वाढीचा सिलसिला कायम आहे. पुण्यातील ही गेल्या दोन महिन्यांतील पाचवी दरवाढ ठरली आहे.

एप्रिल महिन्यापासून CNG च्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिल रोजी प्रथम 1 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आखाती देशांतील तणाव आणि इंधन बाजारातील चढ-उतार यांचा परिणाम किमतींवर दिसून आला. 9 मे रोजी 1.50 रुपयांची वाढ करण्यात आली. याशिवाय मे महिन्यात 9, 15 आणि 27 मे रोजी अशा तीन वेळा दरवाढ जाहीर करण्यात आली होती.

विशेष म्हणजे 27 मे रोजी झालेली 2.50 रुपयांची वाढ ही या कालावधीतील सर्वाधिक वाढ होती. परिणामी, एप्रिलपूर्वी 91.50 रुपये प्रति किलो दराने मिळणारे CNG आता 95.75 रुपये प्रति किलो दरापर्यंत पोहोचले आहे.
गेल्या दीड महिन्यात CNG च्या दरात एकूण 4.50 रुपयांची वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम शहरातील खासगी वाहनधारक, रिक्षाचालक आणि व्यावसायिक वाहनचालकांच्या खर्चावर होणार आहे. दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






