पुणे : परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. जपानमधील रेसकोर्समध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत एका तरुणाची ४ लाख १५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. व्हिसा मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्यानंतर आरोपीने तरुणाला बनावट व्हिसाची पीडीएफ फाईल पाठवली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वानवडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घोरपडी गावातील फैलावाली चाळ परिसरात राहणाऱ्या एका तरुणाची आरोपीशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने तरुणाला जपानमधील रेसकोर्समध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी जपानचा व्हिसा मिळवून द्यावा लागेल आणि त्यासाठी खर्च येईल, असे सांगून आरोपीने तरुणाकडे पैशांची मागणी केली.
आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तरुणाने टप्प्याटप्प्याने एकूण ४ लाख १५ हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने तरुणाला व्हिसाची पीडीएफ फाईल पाठवली. मात्र, व्हिसाची सत्यता तपासली असता तो बनावट असल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

पीडित तरुणाच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी आरबाज माजीद खान (रा. शीतल पेट्रोल पंपाजवळ, कोंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.






