पुणे: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लावणाऱ्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या चौकशीत आता एक धक्कादायक आणि तितकाच चक्रावून टाकणारा खुलासा झाला आहे. तपासातून समोर आलेली माहिती कोणत्याही गुन्हेगारी चित्रपटाच्या पटकथेला मागे टाकणारी आहे. ज्या यंत्रणेवर परीक्षेची गोपनीयता राखण्याची जबाबदारी होती, त्याच व्यवस्थेतील तज्ज्ञांनी वैयक्तिक फायद्यासाठी सौदा केल्याचे पुण्यात उघड झाले आहे.
संपूर्ण पेपरफुटी घोटाळ्याचे केंद्र कात्रज परिसरातील एक सर्वसामान्य ब्यूटी पार्लर ठरले आहे. पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे आणि तिथे नियमित येणारी मॉडर्न कॉलेजची शिक्षिका मनीषा मांढरे यांच्यातील साध्या ओळखीचे रूपांतर लवकरच एका संघटित गुन्हेगारी कृत्यात झाले. या कटाची सर्वात गंभीर बाजू म्हणजे, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) मनीषा मांढरेची ‘नीट’ परीक्षेसाठी तज्ज्ञ म्हणून निवड केली होती. या पदाचा गैरफायदा घेत तिने पेपर फोडले. या साखळीत रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी देखील जोडले गेले. मांढरे आणि कुलकर्णी हे पेपर फोडायचे आणि वाघमारे तिच्या नेटवर्कचा वापर करून गरजू व श्रीमंत ग्राहक शोधायचे, असा हा सुनियोजित प्लॅन होता.
तपासात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. या टोळीने निवासस्थानी एक कोचिंग क्लास सुरू केला होता. येथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून पैसे घेतले जात होते. क्लासेस थेट परीक्षेला येणारे प्रश्न वहीत लिहून घेण्यास सांगितले जात होते.
सध्या सीबीआय या दोन्ही महिलांच्या आणि प्राध्यापकांच्या बँक खात्यांचा आणि कॉल डिटेल्सचा तांत्रिक तपास करत असून, यामागे आणखी मोठे रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.







