पुणे : वारस नोंदणीचे प्रलंबित काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चोली बुद्रुक येथील तलाठी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये सुनील भिकाजी सातोसे (वय 44), ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), चोली बुद्रुक आणि नेमाजी माधवराव भोकरे (वय 40), खासगी व्यक्ती यांचा समावेश आहे.
तक्रारदाराच्या आजोबांच्या मालकीची चोली बुद्रुक येथील वडिलोपार्जित शेती जमीन असून त्यांच्या निधनानंतर संबंधित जमिनीवर तक्रारदाराचे वडील आणि काका यांच्या नावाची वारस नोंद करण्यासाठी डिसेंबर 2025 मध्ये अर्ज करण्यात आला होता. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही वारस नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती.
29 मे 2026 रोजी तक्रारदार महसूल कार्यालयात चौकशीसाठी गेले असता तलाठी सुनील सातोसे यांनी काम करून देण्यासाठी सुरुवातीला 1,80,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. त्यानंतर तडजोडीनंतर ही रक्कम 80,000 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने 1 जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची पडताळणी 4 जून रोजी करण्यात आली. त्यावेळी तलाठी सातोसे यांनी 80,000 रुपयांच्या मागणीवरून तडजोड करत 70,000 रुपये स्वीकारण्यास सहमती दर्शवली. तसेच ही रक्कम खासगी व्यक्ती नेमाजी भोकरे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यानंतर 8 जून रोजी चोली बुद्रुक ग्राम महसूल कार्यालयात सापळा रचण्यात आला. तलाठीच्या सांगण्यावरून नेमाजी भोकरे यांनी तक्रारदाराकडून 70,000 रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दुपारी 3:12 वाजता दोघांना रंगेहात पकडले.
या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. मा. विशेष न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी त्यांना 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाई पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी पार पाडली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त निता मिसाळ करत आहेत.
दरम्यान, शासकीय कामासाठी कोणताही अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणारी व्यक्ती कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील यांनी केले आहे.







