पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य (Pune Vidhan Parishad Election) संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत नाराजी उफाळून आल्याची चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा काही तासांचा अवधी शिल्लक असताना माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे (Vikram Kakde) यांच्या नावाची चर्चा पुढे आल्यानंतर पक्षातील अनेक नेते नाराज झाल्याचे समोर येत आहे.

या नाराजीची दखल घेत पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक सुरू असून, गेल्या काही तासांपासून त्यामध्ये चर्चा सुरू आहे. पक्षातील असंतोष दूर करण्याबरोबरच संभाव्य बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न या बैठकीत केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
आज सकाळी विक्रम काकडे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे पक्षप्रवेश न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी विक्रम काकडे यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. पक्षासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संधी न देता नव्या चेहऱ्याला प्राधान्य दिले जात असल्याची भावना अनेकांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीला आमदार सुनील शेळके, सुनील टिंगरे, विलास लांडे, चेतन तुपे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. तसेच विक्रम काकडे आणि संजय काकडे हे देखील चर्चेत सहभागी झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, विक्रम काकडे यांच्या नावामागे पार्थ पवार यांचा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्यात पक्ष नेतृत्वाला कितपत यश येते आणि अखेर उमेदवारी कोणाला मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







