पुणे: पुण्यातील हडपसर परिसरात २०१७ मध्ये घडलेल्या अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ पथकाने अटक केली आहे. तब्बल ९ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

अमर बबन घाडगे (वय २९, रा. दीपकनगर, गोपाळपट्टी, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अमोल आडेगावकर, मारुती गवळी आणि इतर साथीदारांसह एका तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अमर घाडगे फरार झाला होता.
३० मे रोजी शहरात राबविण्यात आलेल्या कॉम्बिंग आणि राऊंडअप ऑपरेशनदरम्यान गुन्हे शाखेचे युनिट ६ पथक फरार आरोपींची माहिती गोळा करत होते. यावेळी पोलिसांना त्यांच्या खबऱ्यामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. लक्ष्मी कॉलनी परिसरात अमर घाडगे उभा असल्याची आणि त्याच्या हातावर ‘Payal’ असे गोंदलेले असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.
माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपली ओळख सांगत संबंधित गुन्ह्यातील सहभाग कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला हडपसर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात आल्याने पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले असून या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.






