पिंपरी-चिंचवड: पुण्यातील आळंदी परिसरात कौटुंबिक वादातून चुलत्याने पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी झाला असून आळंदी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

ही घटना शनिवारी सायंकाळी अशोकनगर परिसरात घडली. स्वप्नील सुरेश भोसले (वय 42) हे पत्नीसोबत रस्त्याने जात असताना त्यांचे चुलते बाळासाहेब दादू भोसले आणि सुरेखा बाळासाहेब भोसले यांनी त्यांना अडवले. जुन्या कौटुंबिक वादाच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.
वाद वाढल्यानंतर आरोपी बाळासाहेब भोसले यांनी संतापाच्या भरात धारदार चाकू काढून स्वप्नील भोसले यांच्यावर हल्ला केला. चाकूचा वार थेट गळ्याच्या दिशेने झाल्याने स्वप्नील गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी स्वप्नील भोसले यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार बाळासाहेब भोसले आणि सुरेखा भोसले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नात्यातील वाद इतका टोकाला गेल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू असून नेमक्या वादाचे कारण आणि हल्ल्यामागील पार्श्वभूमीची चौकशी केली जात आहे.







