Pune : पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसलेले प्रसिद्ध ज्योतिर्लिंग भिमाशंकर परिसर लवकरच मोठ्या विकास आराखड्याचा साक्षीदार ठरणार आहे. मंदिर परिसरातील वाढती गर्दी आणि भविष्यातील यात्रेकरूंची सोय लक्षात घेऊन प्रशासनाने मंदिराजवळील 125 कुटुंबांचे पुनर्वसन करून सुमारे 10.5 एकर जागेत नियोजित स्वरूपाचे नवे गाव उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 174 कोटी खर्च अपेक्षित आहे.

सध्या मंदिर परिसरात विस्तारीकरण आणि मूलभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मंदिर 3 महिने पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. या निर्णयामागे केवळ दुरुस्ती नव्हे, तर भाविकांसाठी सुरक्षित आणि सुसूत्र व्यवस्था उभारण्याचा व्यापक उद्देश आहे. विशेष म्हणजे आगामी कुंभमेळा 2027 दरम्यान दररोज जवळपास 1 लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्याच्या अरुंद प्रवेशमार्ग आणि अनियोजित बांधकामामुळे मंदिर परिसरात मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी निर्माण होते.
मंदिराच्या मुख्य प्रवेशमार्गावर सध्या सुमारे 110 घरे असल्याने भाविकांच्या ये-जा करण्यास अडथळे निर्माण होतात. त्यामुळे मंदिरापासून केवळ 150 मीटर अंतरावर नव्या जागेत या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी ग्रामस्थांची बैठक गुडी पाडवा च्या दिवशी आयोजित केली जाणार आहे.
नव्या गावाचा आराखडा 4 टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण जागेच्या 20% भागात ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पार्किंग प्लाझा उभारले जाईल. दुसऱ्या टप्प्यात 35% जागेत पुनर्वसित कुटुंबांसाठी घरे बांधली जातील. तिसऱ्या टप्प्यात 15% भागात 40 ते 50 हेरिटेज शैलीतील दुकाने आणि खुली जागा विकसित केली जाईल, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील. चौथ्या टप्प्यात उर्वरित 30% जागेत 9 मीटर रुंदीचा रस्ता, वन्यजीवांपासून संरक्षणासाठी भिंत आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाणार आहे.
भाविकांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था, स्थानिकांचे पुनर्वसन आणि पर्यावरणाचा समतोल राखत धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रामस्थांची संमती मिळाल्यानंतर या नव्या गावाच्या उभारणीला गती मिळणार आहे.







