पुणे : शरद मोहोळ हत्याकांड प्रकरणात राजकीय दबाव असण्याची शक्यता असल्याचा आरोप हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केला आहे. तसेच मोहोळ हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद मोहोळ हत्यांकाड प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. पुण्यात एका हॉटेलमध्ये कट रचला; मात्र त्याचा सीसीटीव्ही सापडत नाही. तसेच गाडीत पैसे सापडले त्याचा तपास होत नाही, पिस्तुल सापडले त्याचा तपास नाही, कारण यामागे राजकीय दबाव आहे, असे मत एकबोटे यांनी व्यक्त केले. एकबोटे म्हणाले की, महाराष्ट्रातील हिंदूत्ववादी संघटनांतर्फे २८ जानेवारीला पुण्यात एक जन मोर्चा काढला जाणार आहे. किनारा हॉटेल ते श्री शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड येथपर्यंत हा मोर्चा असणार आहे. हे टोळीयुद्ध आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपुरी माहिती दिली जात होती. आता स्वाती मोहोळ यांनी संपूर्ण माहिती फडणवीस यांना दिली आहे.
दरम्यान, शरद मोहोळ हत्याकांडातील मुख्य आरोपी रामदास मारणेला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मोहोळ हत्याप्रकरणी एकूण २४ आरोपींना अटक केली असून, या कारवाईत नवी मुंबई पोलिसांना मोठ यश आले आहे. पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने शरद मोहोळ हत्या प्रकरणात दहा जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केलीय. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे यांच्यासह दहा जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अटक केली आहे.
राजकारण आणि समाजकारणामध्ये शरद मोहोळ याचा कोणाशी वाद नव्हता, असेही एकबोटे यांनी स्पष्ट केले. शरद मोहोळ यांनी गो रक्षण चळवळ वाढवली होती. अतिरेकी संघटनांचे काही कटकारस्थान केले का, अशी शंका आहे. शरद मोहोळ यांच्या हत्येमागील कटकारस्थाने उघडकीस आणली पाहिजेत, असेही एकबोटे म्हणाले.