पुणे: पिस्तुलाचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला विश्रांतवाडी पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. राज उर्फ सोन्या रविंद्र भवार (वय २४, रा. विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
गुरुवारी (दि. १० जुलै) राज भवार हा धानोरी रस्त्यावरील पाण्याच्या खदानीजवळ थांबलेला होता. त्याच्याकडे एक विदेशी बनावटीचे पिस्तूल होते. हे पिस्तूल हातात धरून तो रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना धमकावत होता. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

गुप्त बातमीदारामार्फत याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पिस्तूल कमरेला लपवत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात यश मिळवले. भवारकडून पोलिसांनी ८५ हजार रुपये किमतीचे एक विदेशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. त्याच्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव, आणि निरीक्षक (गुन्हे) मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.ही कारवाई उपनिरीक्षक महेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव, आणि होना साबळे यांनी केली.







