पुणे : सिंहगड हे पुणेकरांचे आवडते पर्यटनस्थळ आहे, मग तो कोणताही ऋतू असो. मात्र, आता सिंहगडावर जाण्यापूर्वी पर्यटकांना एका नव्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. 14 ऑगस्ट 2025 पासून, सिंहगडावर जाण्यासाठी ‘किल्ले सिंहगड’ या मोबाइल अॅपद्वारे पूर्वनोंदणी करणे बंधनकारक आहे. हा किल्ला असा नियम लागू करणारा महाराष्ट्रातील पहिला किल्ला ठरला आहे.

वन विभागाने पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आणि सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे हा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळ्यात रविवारी 12 ते 15 हजार पर्यटक गडावर येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.

आता ‘किल्ले सिंहगड’ अॅपद्वारे पर्यटकांना आधी ऑनलाइन बुकिंग करावी लागेल. हे अॅप अँड्रॉइडच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे, आणि लवकरच आयफोन वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध होईल.

प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस ही योजना राबविल्यानंतर, अॅपद्वारे नोंदणी पूर्णपणे बंधनकारक केली जाईल. याशिवाय, वन विभागाने प्रतिदिन पर्यटकांची प्रवेश मर्यादा ठरवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे गडावरील गर्दी नियंत्रित होईल.
अॅपमध्ये काय आहे?
-सिंहगडाची ऐतिहासिक माहिती
-वनसंपदा आणि वन्यजीवांची माहिती
-गडावर वाहतूक कोंडी, मधमाश्यांचा हल्ला किंवा अपघात झाल्यास अलर्ट
-गड परिसरातील पार्किंग सुविधा
-वणवा किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीची माहिती
दरम्यान, वन परिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांनी सांगितले की, ‘या अॅपमुळे पर्यटक आणि वन कर्मचाऱ्यांना फायदा होईल. यामुळे पर्यटकांची संख्या आणि गडावरील परिस्थितीवर लक्ष ठेवणे सोपे होईल. तसेच गर्दी वाढल्यास तात्काळ प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेता येईल.







